--------------------------------------------------------


विजय चव्हाण म्हणजे 'मोरूची मावशी' इतकी ती ओळख घट्ट झाली होती. पण विजय चव्हाण यांच्या कारकिर्दीला केवळ एका नाटकाने ओळखणे त्या प्रतिभासंपन्न व मेहनतीने वर आलेल्या कलाकारासोबत खूपच अन्यायकारक ठरते. आज २४ ऑगस्ट. विजयजींचा स्मृतिदिन. आज त्यांना आपल्यातून जाऊन दोन वर्षे झाली. 


१९५५ साली मुंबईतील एका सामान्य गिरणी कामगार वडिलांच्या घरात जन्मलेल्या विजयजींचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण मुंबईतूनच झाले. रुपारेल कॉलेजमधून बी.ए. शिकत असतांना एकदा त्यांना अपघाताने अभिनयाची संधी मिळाली. अपघाताने या अर्थाने कि नाटकातला एक कलाकार आजारी पडल्याने त्याच्या जागी काम करायचे होते. या अपघाताचा परिणाम असा झाला कि नंतर एका एकांकिकेत काम केले व त्या कामाचा पुरस्काराने सन्मान झाला. हा विजय चव्हाण यांचा अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यासाठीचा टर्निंग पॉईंट ठरला. पण घरची आर्थिक परिस्थिती अगदीच सामान्य. त्यामुळे नाटकं-मालिका करत असतांना अनेक वर्षे नौकरीसुद्धा करावी लागली. 


विजय कदम यांच्यासोबत रंगतरंग नावाची नाट्यसंस्था स्थापन केली. पुरुषोत्तम बेर्डे यांच्या टुरटुर या नाटकात काम करीत असतांना लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याशी झालेल्या ओळखीचा फायदा विजयजींना झाला. तो असा कि जेंव्हा सुधीर भट्ट 'मोरूची मावशी' करिता लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याकडे गेले तेंव्हा लक्ष्मीकांत यांनीच या भूमिकेसाठी विजय चव्हाणांची शिफारस केली. आणि मग मोरूची मावशीतील मावशीने रंगभूमीवर यशाचा इतिहास घडविला. "टांग टिंग टिंगाक, टांग टिंग टिंगाक, टांग टिंग टिंगाक टूंग" करत मावशीच्या भूमिकेत साडी घालून पिंगा घालणाऱ्या विजय चव्हाणांनी अवघ्या महाराष्ट्राच्या रसिकांची मने जिंकली. महाराष्ट्राबाहेरही देशभर तसेच परदेशात मावशीचे असंख्य प्रयोग झाले. मावशी सोबतच हयवदन, शाकुंतल, कार्टी प्रेमात पडली, आम्ही सज्जन, कशात काय अन लफड्यात पाय, देखणी बायको दुसऱ्याची, येता का खंडाळ्याला, श्रीमंत दामोदरपंत, लहानपण देगा देवा, बाबांची गर्लफ्रेंड  इत्यादी काही विजयजींची गाजलेली नाटके.  


८०-९० च्या दशकात मराठी दूरदर्शनवर विजयजींनी अनेक मालिकांत कामे केली. सोबतीला मराठी चित्रपटातूनही लहान सहान चरित्र भूमिका चालूच होत्या. आली लहर केला कहर, घोळात घोळ, माहेरची साडी, येऊ का घरात, बलिदान हे ते काही चित्रपट. ज्या चित्रपटातील भूमिकेसाठी विजयजींना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला ते होते अशी असावी सासू, वाहिनीची माया, कमाल माझ्या बायकोची व ती. विजयजींचे विनोदाचे टायमिंग व सेन्स जितका परफेक्ट होता तितक्याच सहजतेने ते गंभीर भूमिकांना पण न्याय देत असत. २०१८ साली विजयजींना शासनातर्फे चित्रपती व्ही शांताराम लाइफटाईम पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. 


आपल्या विनोदी अभिनय शैलीने विजयजींनी रंगभूमी, दूरदर्शन व चित्रपट रसिकांचे कित्येक वर्ष मनोरंजन केले. साध्या मध्यमवर्गीय कुटुंबातून पुढे येत, संघर्ष करत, स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या या प्रतिभासंपन्न अभिनेत्यास त्यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन.  



#TributeToVijayChavan #VijayChavan #VijayChavhan #DeathAnniversary #Comedian #Actor #MarathiDrama #MarathiFilms #Television