।। शिवरायांचे अर्थकारण ।।
- राज्याचे उद्योगमंत्री मा. सुभाष देसाई यांचा दैनिक लोकसत्ता मध्ये प्रकाशित झालेला लेख.

उद्योग-व्यापारास प्रोत्साहन, शेतकऱ्यांना आधार आणि त्याच वेळी राज्याचे उत्पन्न वाढवण्यासाठी कल्पक उपाय ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्थनीतीची वैशिष्टय़े. उद्याच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त या अर्थनीतीचे स्मरण..

आपल्या रयतेला जुलमी सम्राटांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी शिवाजी महाराजांनी उत्तरेतील बलाढय़ मुघल व दक्षिणेतील पाच पातशाह्यंशी झुंज घेतली. तरीसुद्धा परकीय सत्ता त्यांना केवळ एक बंडखोर म्हणूनच ओळखत होत्या. जगाने आपल्याला सार्वभौम राजा मानले पाहिजे याच हेतूने शिवरायांनी स्वत:चा राज्याभिषेक घडवून आणला. बरोबर ३४६ वर्षांपूर्वी रायगडावर शिवराय छत्रपती झाले. मराठय़ांचा प्रमुख हा अस्सल राजा असल्याचा जयघोष दुमदुमला. पण इतक्यावरच महाराजांची ओळख संपत नाही, ते द्रष्टे अर्थनीतिज्ञही होते. लढाया जिंकण्याबरोबरच धन मिळविणे, ते योग्य कारणांसाठी वापरणे आणि धनाची भविष्यासाठी चोख गुंतवणूक करणे यात महाराजांचा धोरणीपणा जागोजागी दिसतो. त्यामुळे ‘श्रीमंत योगी’ हे त्यांचे वर्णन अचूक ठरते!

प्रभानवल्लीच्या रामाजी अनंत सुभेदाराला महाराजांनी केलेली राजाज्ञा आजच्या राज्यकर्त्यांना जशीच्या तशी प्रेरणा देते. या आज्ञेत महाराज म्हणतात : ‘ज्याच्याकडे शेती करावयाची ताकद आहे, परंतु त्याच्याकडे नांगरटीसाठी बैल नाही, पोटास दाणे नाहीत, त्यामुळे तो अडून बसला आहे, निकामी झाला आहे तरी त्याला दोन-चार बैलांसाठी पैसे द्यावे किंवा बैल घेऊन द्यावेत. पोटासाठी खंडी- दोन खंडी दाणे द्यावेत. असे करून जितके शेत त्यास करवेल तितके त्यास करू द्यावे.  त्याच्याकडून बैल-दाण्याचे पैसे वाढी-दिढीने वसूल न करता, जे मुद्दल दिले असेल ते केवळ उसनवारीने अगर परतबोलीच्या रूपाने दिल्याप्रमाणे त्याच्या ताकदीप्रमाणे वसूल करीत जावे. जोपर्यंत त्याला पूर्ण ताकद येईल, तोपर्यंत असेच वर्तन करावे. यासाठी तू लाख-दोन लाख लारी (चांदीचे नाणे; किंमत साधारणपणे तत्कालीन अर्धा रुपयाएवढी) खर्च करशील आणि त्याला ताकदवान करशील, पडजमीन लागवडीखाली आणून सरकारचा वसूल ज्यादा करून देशील तर ते साहेबाला मान्य आहे. आणि तेवढा पैसा त्यासाठी दिला जाईल.’

महाराजांचे आणखी एक आज्ञापत्र आजच्या परिस्थितीवर नेमके भाष्य करते : ‘तसेच कुणबी पुढे कष्ट करावयाची उमेद बाळगतो, पण मागील बाकीचा बोजा त्याजवर आहे आणि तो देण्याची त्याची ऐपत नाही. त्या खंडाच्या बाकीच्या हप्त्यामुळे तो कुणबी अगदी मोडून गेला आहे आणि गाव सोडून तो जाऊ पाहत आहे. अशी बाकी ज्या कुळांवर असेल ते सारे माफ करण्यासाठी खंडांचे हप्ते तहकूब करून नंतर साहेबाला कळवावे की, गरीब कुळाची बाकी वसूल न झाल्याने ती माफ केली आहे. असे कळविले म्हणजे साहेब माफीची सनद देतील (५ सप्टेंबर १६७६).’

वरील आज्ञापत्रावरून शेतीची, शेतकऱ्यांच्या अडचणींची किती बारीकसारीक माहिती महाराजांना होती ते कळते. शेती प्रश्नासंबंधातील अधिकाऱ्यांच्या वर्तनाबाबत महाराज कसे करारी होते, याची कल्पना येते.

कालव्यांच्या-पाटाच्या पाण्यावर शेती फुलवायची पद्धत मराठी मुलखात तेव्हाही होती.  १६५३ मधील शिवापूरच्या कालव्याची हकिकत महाराजांविषयीचा आदर द्विगुणित करते. शिवापूर, पुणे येथे बाग, आमराई करावी म्हणून तेथे कामावर असलेल्या येस पाटील कोंढवेकर यास महाराजांनी आज्ञा केली – ‘आम्ही स्वारीवरून येतो तो पावेतो हर इलाज करून धोंडा फोडून पाण्यास वाट करून देणे.’ आज्ञा शिरसावंद्य मानून येस पाटलाने महाराज परत येण्याच्या आत धोंडा फोडून पाण्यास सुरळीत वाट करून दिली. महाराजांनी येस पाटलाला या कामाची बक्षिशी म्हणून सिंहगडाजवळील एका गावाची पाटीलकी दिली!

स्वराज्यातील व्यापार भरभराटीला आला पाहिजे या हेतूने महाराजांनी प्रथम राजगडावर आणि पुढे रायगडावर प्रशस्त बाजारपेठा वसवल्या.  गडांखालीही पेठा निर्माण केल्या. इतकेच नव्हे, तर निरनिराळ्या वारी बाजार करवून रयतेच्या जीवनात सुखाचे दिवस आणले. शिवरायांनी किल्ल्यांच्या पायथ्याशी प्रचंड वनराया तयार करून घेतल्या, जतन केल्या. शेतकऱ्यांसाठी आणि स्वराज्यासाठी उत्पन्नाचे स्रोत निर्माण केले.

मुघलांच्या अफाट फौजेशी नेमक्या शिलेदारांसह मोकळ्या मैदानांवर लढाया करणे वेडेपणाचे ठरले असते. म्हणून महाराजांनी दुर्गनीती अवलंबिली.  एकामागून एक बेलाग दुर्ग जिंकत गेले. जिंकलेले किल्ले अभेद्य करण्यासाठी डागडुजी केली. काही पुन्हा बांधून काढले. मुरुंबदेवाच्या डोंगराचे बळकट किल्ल्यात रूपांतर करून त्याला ‘राजगड’ नाव दिले. तसाच रायरीचा डोंगर म्हणून ज्ञात असलेल्या गडावर चमत्कार वाटावा अशा मोठमोठय़ा वास्तू उभारून त्याचे राजधानी रायगडात रूपांतर केले. या दोन्ही किल्ल्यांचा संबंध शिवरायांच्या अर्थधोरणाशी आहे. राजगडावरून कोकणातून घाटावर येणाऱ्या व्यापारी मार्गावर नियंत्रण ठेवता आले. महाड हे तर प्राचीन महत्त्वाच्या बंदरांपैकी एक. सागरी सफरींवरून येणारा माल कऱ्हाड, पैठण अशा दूरदूरच्या पेठांकडे जाई, तर देशावरचा शेतमाल बंदरांवर पोहोचे. या सर्व वाटांवर जकातीचे मोठे उत्पन्न स्वराज्याला मिळे. स्वराज्याच्या वार्षिक उत्पन्नापैकी सुमारे पाच कोटी रुपये (तेव्हाचे मूल्य) इतके उत्पन्न कोकण व घाटमाथ्यावरील जकात वसुलीतून येत होते. थळघाट, नाणेघाट, बोरघाट, वरंधा घाट, आंबेनळी घाट, कुंभार्ली घाट, आंबा घाट, एकांडा घाट आणि आंबोली घाट हे सर्व घाटमार्ग स्वराज्याच्या संपत्तीत भर घालत होते.  धोरणी आणि दूरदृष्टी असलेल्या शिवरायांनी या घाटमार्गाच्या आजूबाजूचे जवळजवळ सर्व किल्ले काबीज केले. पन्हाळा, गगनबावडा, वासोटा, सिद्धगड, हरिश्चंद्रगड, अलंग-कुलंग, लोहगड, विसापूर, प्रबळगड, राजमाची, रायगड, राजगड, प्रतापगड असे ३६० दुर्गम किल्ले आजही महाराजांच्या चतुर अर्थ-राजनीतीची साक्ष देतात.

डोंगरी किल्ल्यांना घाटमार्गाने व्यापारी बंदरांशी जोडता येऊ शकतील असे जलदुर्ग महाराजांनी पश्चिम किनारपट्टीवर उभारले. युद्धांत जिंकलेले खजिने आणि सुरतेसारख्या मोहिमांमध्ये हस्तगत केलेले प्रचंड धन महाराजांनी नवे समुद्री किल्ले बांधण्यासाठी किंवा पुरातन किल्ल्यांच्या पुनर्बाधणीसाठी खर्च केले. त्यामुळेच खांदेरी, कुलाबा, पद्मदुर्ग, सुवर्णदुर्ग, गोपालगड, रत्नदुर्ग, विजयदुर्ग, सर्जाकोट, सिंधुदुर्ग असे जलदुर्ग महाराजांनी अल्पावधीत सुसज्ज करून स्वराज्याचे तेज वाढवले. तसेच लष्करी ताकदीचा व्यापारी फायद्यासाठी दीर्घकाळ उपयोग होत राहावा म्हणून इंग्रज, पोर्तुगीज, डच या युरोपीय दर्यावर्दी शत्रूंना तोडीस तोड स्वराज्याचे आरमार उभे केले.

मस्कतच्या अरबांचे व पोर्तुगिजांचे एकमेकांवर हल्ले सुरू असत. त्यांची गलबते एकमेकांचा पाठलाग करत. ही स्पर्धा भारताच्या किनाऱ्यावरील व्यापारी मक्तेदारीसाठी होती. त्यात अरबांचे लक्ष व्यापाराकडे, तर युरोपीय योद्धय़ांचे लक्ष सत्ता संपादनाकडे आहे हे हेरून ‘शत्रूचा शत्रू’ या नात्याने अनेकदा पोर्तुगिजांना पिटाळून लावून मराठी आरमाराने अरब व्यापाऱ्यांना संरक्षण दिल्याचे उल्लेख सापडतात. शिवरायांनी व्यापारी उद्दिष्टांसाठी मस्कतच्या इमामाशी थेट संबंध प्रस्थापित केले होते. त्या काळी मक्का, काँगो, इराणशी मराठय़ांचा व्यापार चाले. राजापूरचे बंदर महाराजांनी १६६१ मध्ये आदिलशहाकडून जिंकून घेतले होते. पन्हाळ्याच्या वेढय़ाच्या वेळी इंग्रजांनी सिद्दी जोहरला मदत करत तोफा डागल्या होत्या. त्याचा प्रचंड संताप महाराजांच्या डोक्यात होता. महाराजांनी राजापूरच्या मोहिमेत तेथील इंग्रजांची वखार चार फूट खोल खणून काढली. सर्व माल जप्त केला. त्यांची माणसे पकडून वासोटा किल्ल्यावर डांबून ठेवली. पुढे काही वर्षांनी स्वराज्याच्या व्यापारवृद्धीसाठी इंग्रजांशी वाटाघाटी करून राजापूरची वखार पुन्हा सुरू करू दिली! ही सगळी माहिती इंग्रजांच्या फॅक्टरी रेकॉर्डमध्ये मिळते.

महाराजांचे पंतप्रधान मोरोपंत पिंगळे यांनी लिहिलेल्या पत्रात ‘मौजे परमाची ता. सिवतर येथे नवी बाजारपेठ वसविली तर १२ वर्षे करमाफीची तरतूद’ केल्याचे लिहिले आहे. १२ वर्षे सरकारला कर द्यायचा नाही; व्यापार-व्यवसाय करायचा. १२  वर्षांनंतर त्यावेळच्या दराप्रमाणे कर भरायचा, असे ते धोरण होते. आजही उद्योग-व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठी अशा योजना जाहीर केल्या जातात.  शेतसाऱ्याबाबतही महाराजांनी अशीच उदार व सहानुभूतीची दृष्टी ठेवली होती.

उत्तरेकडील मुघल, दक्षिणेतील पाच पातशाह्य, इंग्रज-पोर्तुगिजांची आक्रमणे, स्वकीयांचा त्रास या सर्व संकटांशी चौफेर मुकाबला करणारे शिवराय अजिंक्य ठरले. राज्याभिषेकातून सार्वभौम छत्रपती म्हणून विश्वमान्य झाले. ही महाराजांच्या लढाऊ चरित्राची एक बाजू झाली. त्याच अजोड चरित्राची दुसरी बाजू म्हणजेच रयतेच्या कल्याणाची अहोरात्र काळजी वाहणारा शिवकल्याण राजा! नवे प्रदेश जिंकणे, राज्यकारभाराची घडी बसवणे, राज्यभाषेची मांडणी करणे, विविध करांतून राज्याचे उत्पन्न वाढते ठेवणे, व्यापार-उद्योगाला पोषक व पूरक वातावरण ठेवणे, शेतीसुधारणा घडवून आणणे, अधिकारी वर्गावर वचक ठेवणे, खर्चात बचत व काटकसर करणे अशा विविध उपायांनी महाराजांनी ‘स्वराज्या’चे ‘सुराज्या’त रूपांतर केले.

शिवराज्याभिषेकाच्या या उत्सवदिनानिमित्त (४ जून) शिवरायांना मानाचा त्रिवार मुजरा!