विद्या, उद्यम, कला, संस्कृती इथे न काही उणे,
उभ्या भारता भूषण व्हावे असे आमुचे पुणे ।।
लाल महाली इथे नांदली माय जिजाबाई
पहिले वहिले खेळ खेळली येथे शिवशाही
इथल्या मातीमधून चालली शिवबांची चरणे ।।
इथेच तुटली परसत्तेची पहिल्यांदा बोटे
स्वातंत्र्याची पहाट येथे शिवनयना भेटे
इथेच चढली अंधारावर तेजोमय तोरणे ।।
उदया आले इथे पेशवे, बाळाजी, बाजी
इथून उत्तरेकडे दौडले उमदे रण गाझी
रणमर्दानी इथल्या जितली असंख्य समरांगणे ।।
स्वराज्य हा तर आहे माझा जन्मसिद्ध हक्क
तडिल्लतेसम टिळक वैखरी चमचमली लख्ख
गर्जु लागला उग्र केसरी घुमली रानेवने ।।
साहित्यादिक कला उमलल्या फुले ध्येयनिष्ठा
नक्षत्रासम चमकू लागला नवा नवा स्त्रष्टा.
नवी अस्तिमा उजळू लागली आळसलेले जिणे ।।
त्याच सांधिला कुणा अनामिक रसिकांची हौस
टिळकापुढती ठेवी बोलका एक राजहंस
राजहंस तो नेत्या सन्मुख गीत मनोहर म्हणे ।।
जन्म पावली पुण्यात पदवी सत्यत्वा गेली
गंधर्वांची स्मृती पुण्याची धनदौलत झाली
उभी राहिली वास्तू धन ते रक्षाया कारणे ।।
नवल अलौकिक! स्वये लाडक्या गंधर्वाहाती
कोनशिला या शुभवास्तूची स्थापियली होती
नगरजनांनी आता इजसी जपणे, सांभाळणे ।।
....ग.दि.माडगूळकर
0 टिप्पण्या