---------------------------------------------

कथा दादांच्या ’विच्छा’ची...

---------------------------------------------


जागतिक सिनेमाच्या संदर्भात चार्ली चॅप्लीनचे जे कर्तृत्व होते तेच कर्तृत्व आपल्या मराठीत दादा कोंडके यांचे होते. प्रेक्षकांना आपली नाडी दाखवणार्‍या या कलाकाराने रसिकांच्या चवीची नाडी अचूक ओळखली होती. मूळचे पुणे जिल्ह्यातील भोरजवळच्या इंगवलीचे. त्यांचा जन्म मुंबईत ८ ऑगस्ट १९३२ या कृष्णाष्टमीच्या दिवशी झाला. त्यामुळे त्यांचे नाव ‘कृष्णा’ असे ठेवले. कृष्णराव खंडेराव कोंडके हे त्यांचे पूर्ण नाव. पण दादा कोंडके म्हणूनच ते प्रचलित झाले. भोईवाड्यातल्या श्रीकृष्ण बँड पथकात जाऊ लागले. तिथे बुलबुल तरंग, काष्टतरंग, पेटी, सॅक्सोफोन इ. सर्व वाद्ये वाजवायला शिकले. पुढे  सेवादलातल्या कलापथकाच्या कार्यक्रमात भाग घेऊ लागले. इथेच त्यांची निळू फुले व राम नगरकर यांच्याशी दोस्ती झाली. कलापथकाच्या ‘कुणाचा कुणाला मेळ नाही’, ‘पुढारी पाहिजे’, ‘ठणठणपूरचा राजा’, ‘बिनबियांचं झाड’... अशा काही लोकनाट्यांमध्येत्यांनी भूमिका केल्या. पुढे त्यांनी स्वत:चे कलापथक सुरू केले त्याचे नाव ठेवले  ‘दादा कोंडके आणि पार्टी’. 


दादांनी वसंत सबनीस यांचा ‘वीणा’ मासिकाच्या दिवाळी अंकातला ‘छपरी पलंगाचा वग’ वाचला आणि आपल्या कला पथकातर्फे बसवायचं ठरवलं. दादा सबनीसांना भेटले. वगाचं नाव ‘विच्छा माझी पुरी करा’ असं राम नगरकरनं सुचवलं. स्वत: सबनीसांनी बरीच मेहनत करीत ‘विच्छा’ च्या तालमी घेतल्या. २१ डिसेंबर १९६५ रोजी मुंबईच्या राणीच्या बागेत ‘विच्छा’चा पहिला प्रयोग झाला. या वगाने गेल्या पंचावन्न वर्षात हजारो प्रयोग केले. हसवता हसवता अंतर्मूख करणारा, प्रचलीत राजकीय व्यवस्थेवर आपल्या अंगभूत शैलीतून कोरडे ओढणारा हा वग दादांनी अजरामर केला. पुढेया वगात दादांची ‘मुंबई लावणी’ ही या प्रयोगात घेऊ लागले. ‘विच्छा..’ मुळे दादांचं सगळीकडे नाव झाले. ‘विच्छा...’ च्या प्रत्येक प्रयोगात नवे नवे विनोद असत. राजकारणावरच्या विनोदांना फारच भरभरून दाद मिळे. राजकारणातील मंडळीही प्रयोग पाहायला येत. दादा अशा हजर असलेल्या व्यक्तींवर ऐनवेळी मार्मिक विनोदी टिप्पणी करायचे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये धमाल उडायची. प्रचलित राजकारणावर कॉमेन्ट्स करण्याची कला दादांनी अण्णाभाऊ साठे यांच्याकडून घेतली तर शब्दांशी खेळ करवून द्वयर्थी संवाद बोलण्याचं कसब ‘गाढवाचं लग्न’ फेम दादू इंदूलकर यांच्याकडून घेतले...


एकदा आशाताई भालजी पेंढारकरांना ‘विच्छा..’ च्या प्रयोगाला घेऊन आल्या. दादांना त्यांनी तशी कल्पनाही दिली. त्यावेळी दादांनी भालजींवर कॉमेन्ट करून धमाल उडवून दिली. शिपाई असलेले मोहिते उलटी तलवार घेऊन मंचावर येतो. त्यावर दादांनी त्याला म्हटलं- ‘अरे  मराठ्याची अवलाद असून तुला तलवार कशी धरायची हे माहित नाही... मला तुझ्या जल्माची शंका येते. अरे आज तरी तलवार सरळ धर. तलवार कशी धरावी हे शिकवणारा बाप तुझ्यासमोर बसलाय लेका एवढं कळत नाही!’ भालजींच्या शैलीतल्या या खटकेबाज संवादामुळे भालजींसमोरच सार्‍या प्रेक्षकांनी थेटर डोक्यावर घेतलं. इंटरव्हलमध्ये भालजींनी आत येऊन दादांचे कौतुक केले. त्यांना आशीर्वाद दिले व कोल्हापूरला बोलावून त्यांच्या ‘तांबडी माती’ चित्रपटात काम दिले. 


हा चित्रपट फारसा चालला नाही. दादांना सिनेमा हे क्षेत्र काही आपल्याला झेपणार नाही असे वाटले. एखादी खानावळ सुरू करावी असे त्यांना वाटत होते. यावर मार्गदर्शन घेण्यासाठी ते भालजींकडे गेले तेंव्हा ते म्हणाले  ‘काय मर्दा स्वत:ला कलाकार म्हणवतोस आणि खानावळ काढतोस?’ यावर दादांना सिनेमा काढायचा सल्ला त्यांनी दिला आणि आशिर्वाद देताना ते म्हणाले  ‘सगळं जमेल तुम्हाला! मन लावून आणि कंबर कसून प्रयत्न करा. बघू कसं जमत नाही ते. मी आहे तुझ्या पाठीशी!’ 


--- धनंजय कुलकर्णी; 


स्केच सौजन्य- संभाजी लबासे


#DadaKondke #BirthAnniversary #MarathiMovies