पवार साहेब व्यंगचित्र
"असे थोडे थोडकेच व्यक्ती असतात, ज्यांची गणना ' न भूतो न भविष्यति ' यामध्ये होते. जसा क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर किंवा गाण्यात लता मंगेशकर तसेच राजकारणात या व्यक्तीचे नाव घेतले जाते. नेतृत्व, बुद्धीमत्ता, आक्रमकता आणि जनमानसाचा पाठिंबा या जोरावर राजकारणात ' अशक्य ते शक्य ' करुन दाखवणारे हे नाव म्हणजे शरदचंद्र पवार. 

 पवारांच्या नावाभोवती महाराष्ट्राचं राजकारण गेली ५० वर्ष फिरत राहिले आहे आणि आजही फिरते आहे. अगदी ग्रामीण भागातून राजकारण व समाजकारण करत त्यांनी थेट दिल्ली गाठली, अशातच पवार साहेबांवर नुकतीच एक शस्त्रक्रिया पार पडली. त्यानंतर देशभरातून त्यांना चांगल्या आरोग्यासाठी शुभेच्छा मिळाल्या. 

 काही वर्षांपूर्वी अशाच एका आजाराने शरद पवार यांना ग्रासले होते, 'कॅन्सर'. शरद पवार यांना २००४ मध्ये जेव्हा कॅन्सर झाल्याचे निदान झाले, तेव्हा डॉक्टरांनी त्यांना तुमच्याकडे फक्त ६ महिने आहेत, असं सांगितलं होतं. पण या सगळ्या शक्यतांना खोटं ठरवत त्यांनी कॅन्सवर मात केली आणि आज १६ वर्ष झाली त्या घटनेला शरद पवार यांची प्रकृती ठणठणीत आहे. 

 तो २००४ चा काळ होता. लोकसभा निवडणुकांचा प्रचाराला सुरुवात झाली होती. शरद पवार महाराष्ट्रभर फिरत होते. आणि एकेदिवशी त्यांना गालाच्या आतल्या बाजूला सुज आल्याचे जाणवले. त्यांनी तातडीने त्यांचा जीवलग मित्र डॉ. रवी बापट यांना ही गोष्ट सांगितली. पवार साहेबांच्या तपासण्या झाल्या आणि त्यांना तोंडाचा कॅन्सर झाल्याचे निदान झाले. 

 पवार कुटुंबियांसाठी हा एक मोठा धक्का होता आणि संपूर्ण राजकीय वर्तुळात देखील खळबळ उडालीउडाली. शरद पवार पुण्यात आले. पुढे त्यांच्यावर उपचार सुरू झाले. मोठ्या शस्त्रक्रिया झाल्या. पवारांच्या चेहऱ्याचा काही भाग अक्षरश: कापण्यात आला होता आणि त्याठिकाणी मांडीच्या मांसाचा काही भाग लावण्यात आला होता.

 पवारांचे काही दात काढण्यात आले होते. एकुणातच हा काळ त्यांच्यासाठी खुप मुश्किल होता. त्यांना न नीट खाता येत होते, न पाणी पिता येत होते. सगळंच कसं अवघड होऊन बसलं होतं. साधं पाणी पिण्यासाठी देखील त्यांना भुलीचं इंजेक्शन घ्यावं लागायचं. कृषी मंत्री असताना त्यांना तब्बल ३६ वेळा रेडिएशन ट्रीटमेंट घ्यायची होती आणि ही उपचार पद्धती फारच त्रासदायक देखील होती. 

 मात्र आज हा सगळा त्रास सहन केल्याचे फळ म्हणूनच राज्यात त्यांचे सरकार आले आहे. मात्र पवारसाहेबांना हा सगळा त्रास सहन करण्याची आणि कॅन्सरशी लढ्याची प्रेरणा मिळाली होती, ती एका बाईमुळे आणि ती दुसरी-तिसरी कुणी नसुन खुद्द त्यांच्या आई होत्या."