जगातील सर्वोत्तम गुंतवणूकदार म्हणून वॉरन बफे यांच्याकडे पाहिलं जातं. २००८ मध्ये जगातील श्रीमंताच्या यादीत ते अव्वल होते. ते ‘बर्कशायर हॅथवे’ ह्या गुंतवणूक कंपनीचे अध्यक्ष व प्रमुख अधिकारी आहेत. त्यांच्यासारखं यशस्वी व्हावं असं प्रत्येकाला वाटतं. त्यांच्या यशाचं नेमकं गमक काय? हे जाणून घेण्याचं कुतूहल अनेकांच्या मनात आहे, तेव्हा यशस्वी होण्यासाठी त्यांनी काही कानमंत्र दिले आहेत जे प्रत्येकाला यशाची पायरी चढताना उपयोगी ठरणार आहे.
संधी सोडू नका : संधी कोणत्याही रुपात तुमच्यापर्यंत चालून येऊ शकते. त्यामुळे आलेली संधी हातची कधीही घालवू नका!. छोट्या छोट्या संधीचं रुपांतर कधी मोठ्या संधीत होईल हे सांगता येत नाही, त्यामुळे संधी कोणत्या रुपात चालून आली आहे हे ओळखता आलं पाहिजे.
खर्च कमी करणे : आपली आर्थिक स्थिती सुधारायची असेल तर नेहमी कमाईपेक्षा खर्च कमी करण्याची सवय प्रत्येकाने अंगीकारली पाहिजे. अवाजवी खर्चापेक्षा योग्य ठिकाणी पैसा गुंतवणे प्रत्येकाला शिकलं पाहिजे, असं बफे म्हणतात. बफे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असले तरी ते अजूनही जुनी कार आणि जुनाच फोन वापरतात.
विश्वास असल्याशिवाय कुठेही पैसे गुंतवू नका : भविष्याची सोय म्हणून प्रत्येकजण स्थावर मालमत्ता, शेअर वेगवेगळ्या फंडात पैसे गुंतवतात. पण पैसे गुंतवण्यापूर्वी प्रत्येक गोष्टीचा बारकाईने अभ्यास करा, धोके आणि फायदे तपासा असाही सल्ला ते देतात.
मेंढरासारखं वागू नका: जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर मेंढराच्या कळपासारखं वागू नका. जे सगळेच करतात ते करण्यापेक्षा जगावेगळं काहीतरी करा, एकाच व्यक्तीचं ऐकून त्याच्या मागे मागे जाण्यापेक्षा स्वत:चे निर्णय घ्या. एखादी व्यक्ती ज्या मार्गाने यशस्वी झाली तेच तुमच्या यशाचं गमक ठरू शकतं नाही.
मोठी रिस्क घेण्याआधी विचार करा : आयुष्यात मोठं काहीतरी करायचं असेल तर मोठ्या रिस्क घेतल्या पाहिजे हे जरी खरं असलं तरी नेहमी छोट्या छोट्या गोष्टीपासून सुरूवात करावी असा महत्त्वाचा कानमंत्र त्यांनी दिला आहे. मेहनतीने कमावेला पैसा गुंतवताना तो काळजीपूर्वक गुंतवला पाहिजे, एकाच ठिकाणी खूप पैसे गुंतवण्यापेक्षा छोट्या छोट्या आणि वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करणं नेहमीच फायदेशी ठरतं असंही ते म्हणाले
0 टिप्पण्या